मुंबई
शिवसेना फुटून दोन गट पडल्यानंतर हे दोन्ही गट मुंबईतील दोन वेगवेगळ्या मैदानांवर दसरा मेळावे घेऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “जनतेच्या आशीर्वादाने आणि तुमच्या साथीने घासून, बसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली. कारण मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक,तर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे,असा स्वस्तात परत जाणार नाही. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळून जाणारा नाही, तर लोकांना पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक कधीच मैदान सोडत नाहीत. शिवसेनेचे, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडत नाहीत. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे निघालो आहोत”.