शिवाजीनगर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट
पुणे
दर्जेदार मूलभूत आरोग्य सेवा नागरिकांना सत्वर उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू केली आहे. जनतेच्या सेवेसाठी असलेल्या दवाखान्याचा सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.
रविवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी पुणे येथील छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील चाफेकर नगर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आभासी तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आले. त्याची प्रत्यक्ष पाहणी आज उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. याप्रसंगी, शिवसेना शहर समन्वयक धनंजय जाधव, शिवसेना झोपडपट्टी सेना शहर प्रमुख राजू विटकर, वॉर्ड अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, उप अभियंता राजेश खरात, वॉर्ड वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणालिनी कोलते, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी सदर योजना सुरू केली आली आहे. पुणे शहरात वैद्यकीय उपचाराची सेवा गोरगरीब रुग्णांना मोफत मिळावी यासाठी, पुणे शहरात 25 दवाखान्यांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील चाफेकर नगर येथील दवाखाना सुरू झाल्याने गोरगरिब रुग्णांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या दवाखान्यातून मोफत तपासणी, मोफत औषधी, गर्भवती माताची तपासणी, लसीकरण, नेत्र तपासणी, रक्त चाचण्या, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा आदी अनेक महत्वाच्या सेवा नागरिकांना मिळणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
या दवाखान्यासाठी आग्रही राहिलेल्या शिवसेना पुणे शहर समन्वयक धनंजय जाधव यांनी सांगितले की, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निधी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळवून दिल्यामुळेच हा दवाखाना प्रत्यक्षात सुरू करता आला आहे.