पाच कोटी पकडले पण बाकीचे पैसे नेत्याच्या घरापर्यंत पोहचवले गेले
पुणे
निवडणूक आयोगाची यंत्रणा सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील एका आमदाराच्या गाडीत खेड शिवापूर टोल नाक्यावर 15 कोटी रुपये सापडले. यातील 5 कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले गेले, अशी माहिती काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मंगळवारी दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. खेड शिवापुर टोल नाक्यावर खाजगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोखड जप्त केली. सुरुवातीला ही रक्कम 15 कोटी असे जाहीर केले गेले होते. नंतर 5 कोटी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आमदार रविंद्र धंगेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उर्वरित 10 कोटी आमदारांच्या घरापर्यंत पोचवण्यात आले, अशी धक्कादायक माहिती आमदार रविंद्र धंगेकर यांनी यावेळी दिली.
गाडी अडवल्यानंतर 15 कोटी सापडले होते.नंतर 5 कोटी सांगण्यात आले. या वेळी सर्व अधिकारी असताना कोणावरही कारवाई झाली नाही. उलट उर्वरित रक्कम शहाजी बापू च्या घरी पोचवण्यात आली. निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? कारमध्ये असलेल्या लोकांवर गुन्हा का दाखल झाला नाही? म्हणून या सर्व प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सांगितले.
माझा मित्रपरिवार ‘आनंदाची दिवाळी’ नागरिकांना भेट म्हणून देतो. यंदाही ‘आनंदाची दिवाळी’ माझा मित्रपरिवार देत असावा. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो. या उपक्रमात मी स्वतः हजर नव्हतो, पैसे वाटत नव्हतो तरीसुद्धा माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्याचे पोलीस भाजपचा अजेंडा राबवत आहेत. त्यांना गाडीत कोट्यवधीची रक्कम सापडणे गुन्हा वाटत नाही, असेही आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले.
संबंधितांवर गुन्हा दाखल करा
महायुती सरकारकडून यंत्रणेचा गैरवापर करून आचारसंहितेचा भंग होत आहे. रेशनिंग दुकानातून रेशन कार्डधारकांना देण्यात येणाऱ्या शिध्याच्या पिशवीवर पंतप्रधान, मावळते मुख्यमंत्री, मावळते दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा फोटो लावून त्यांची जाहिरात सुरू आहे. हा आचारसंहितेचा भंग असून याबाबत तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पुणे शहर व जिल्ह्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे, असेही ते म्हणाले.