लोकसभेला महाविकास आघाडीने एकजुटीने काम केले आहे.त्यामुळे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात आम्हाला मतांची निश्चित मोठी आघाडी मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाने या मतदारसंघात सर्व ताकद लावून देखील मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे,असा विश्वास पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी व्यक्त केला.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट मित्र पक्षांचे कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी भवानी पेठेतील श्री भवानी मातेचे दर्शन घेऊन भव्य अशी रॅली काढून नवी जिल्हा परिषदेतील कार्यालयात अर्ज दाखल केला.याप्रसंगी पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी जगदीश ठाकुर,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे,आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा थोरात, जेष्ठ नेते अभय छाजेड,माजी आमदार दीप्ती चवधरी,माजी नगरसेवक रफिक शेख, लता राजगुरू,पुणे कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष गौतम महाजन, शिक्षण मंडळ माजी उपाध्यक्ष नरुद्दीन अली सोमजी, करण मखवानी, मंजूर भाई शेख, माजी नगरसेवक अविनाश बागवे,संगीता तिवारी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी रमेश बागवे म्हणाले की, मागील दहा वर्षात कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे वाटोळे केले आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.भाजपाने मतदारसंघात सामाजिक सलोखा उध्वस्त केला आहे. गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. त्यामुळे नागरिक भाजपाला घरचा रस्ता दाखवणार असून आमचा विजय निश्चित करणार आहे, असेही यावेळी त्यांनी सांगितले.