आता थायलंड मध्ये प्रति ‘दगडूशेठ’ गणपती मंदिर

0
19

श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ह्याच लाडक्या गणपती बाप्पांची केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंड मधील फुकेत येथे उभारण्यात आले आहे आणि या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना व पूजन देखील करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने फुकेत मध्ये स्थापन होत असलेल्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक नुकतीच लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदीर अशी काढण्यात आली.

पुण्यात झालेल्या विधिवत पूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण राजूशेठ सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मूर्तीचे विधिवत पूजन करण्याकरिता फुकेत ९ रियल इस्टेट कंपनी लिमिटेड च्या चेअरमन उद्योजिका पापा सॉन मिपा व त्यांचे सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. उद्योजिका पापा सॉन मिपा यांच्या पुढाकाराने व स्व खर्चाने हे मंदिर उभे रहात आहे. ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी चेतन लोढा यांनी याकरिता समन्वय व विशेष सहकार्य केले.

मिस पापा सॉन मिपा म्हणाल्या, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला देखील शक्ती मिळते. फुकेत मध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते. मात्र, दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीयांच्या सहकार्यामुळे हे आज शक्य होत आहे. याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आमचे प्रधानमंत्री देखील फुकेत मध्ये सुरु असलेले मंदिराचे कार्य पहात आहेत.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, थायलंड मध्ये बाप्पांच्या मंदिर आणि मूर्तीच्या स्थापनेने भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव यानिमित्ताने होत आहे. तेथे तब्बल ५० फूट मंदिर उभारण्यात आले आहे. हे गणपती मंदिर लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय या नावाने रवाई बीच फुकेत मध्ये आहे. यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आता थायलंड सह आजूबाजूच्या गणेशभक्तांना देखील घेता येणार आहे.

ते पुढे म्हणाले, दगडूशेठ गणपतीच्या मुख्य मूर्ती सोबत पंचधातूची छोटी मूर्ती, त्याचबरोबर सिद्धी माता, बुद्धि माता, श्री लक्ष, श्री लाभ या मूर्ती देखील तेथील मंदिरात कायमस्वरूपी प्रतिस्थापना होणार आहे. तसेच पुण्यातील मंदिरात जसे शंकराचे मंदिर आहे तसेच फुकेत येथील मंदिरात देखील असेल. दगडूशेठ गणपती बाप्पांची हुबेहूब मूर्ती पुण्यात साकारण्यात आली. तीमूर्ती बनवण्यासाठी १ वर्ष २० दिवस इतका कालावधी लागला आहे. गणपती बाप्पा जगभरातील भक्तांचे आराध्य दैवत आहे. थायलंडमधून अनेक भाविक पुण्यात येतात. आता भाविकांना तेथे बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. तब्बल ९ कोटी रुपये खर्च आता पर्यंत मंदिराकरिता झालेला आहे.

सुमारे १५ महिन्यात मंदिराचे काम पूर्ण

या मंदिराचे भूमी पूजन जुलै २०२३ रोजी करण्यात आले व सुमारे १५ महिन्यात ह्या मंदिराचे काम जवळ जवळ पूर्ण होत आहे . त्यांनी तेथील मूर्तीमध्ये सुद्धा गणेश यंत्र आपल्या बाप्पाच्या मंदिरात सिद्धि करून त्याचे विधीवत पूजन करून बसवली आहे. फूकेत मध्ये सुद्धा बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठा करून लवकरच मंदिर सर्व भाविकांना दर्शना करिता खुले करण्यात येणार आहे. संपूर्ण मंदिर व गणेश मूर्ती आणि सर्व गणेश परिवार देवांच्या मूर्तीसह दागिने देखील करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here