राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच नेत्यांच्या प्रचाराच्या सभांचा धडाका सुरु आहे. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडली.
यावेळी राज ठाकरे म्हणाले की,‘उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या कोणत्याही फुकट गोष्टी मिळणार नाहीत, जातीपातीच्या पलिकडे माझे तरुण आणि तरुणी मोठे झाले पाहिजेत. आज लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला काही पैसे मिळाले असतील. काही महिलांना मिळाले असतील किंवा काहींना मिळालेही नसतील. मात्र,यामधून काहीही हाताला लागणार नाही. उद्या माझं सरकार आल्यानंतर असल्या फुकट गोष्टी कोणत्याही मिळणार नाहीत. ज्या माझ्या महिला भगिनी आहेत. त्यांच्या हाताला काम मिळेल आणि सक्षण करण्याचं काम मी करेन.राज्यातील प्रत्येक माणूस आपण सक्षम केला पाहिजे. पण सर्व बांजूनी आपला सत्यनाश होतो आहे. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.