स्वतःच्या नावात आईचे नाव लावण्याचा निर्णय महिलांचा सन्मान वाढवणारा : डॉ नीलम गोऱ्हे

0
15

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घरेलू कामगारांसह समस्त महिला वर्गासाठी अर्थात लाडक्या बहिणींसाठी असंख्य महत्त्वपूर्ण आणि क्रांतीकारी निर्णय घेतले. घरेलू कामगारांसाठी योजना आणल्या तर स्वतःच्या नावात वडिलांसह आईचेही नाव लावण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी समस्त महिलांचा सन्मान वाढवला आहे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटनेच्या वतीने मुंबईतील चेंबूर येथे काल गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी घरेलू कामगारांसाठी आयोजित भाऊबीज मेळावा कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या.याप्रसंगी माजी नगरसेविका आशाताई मराठे, संघटनेचे अध्यक्ष सुभाष मराठे, उपाध्यक्ष सलीम शेख यांसह इतर मान्यवर व घरेलू कमगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्री आधार केंद्रामध्ये अनेक घर कामगार करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याने त्यांचे प्रश्न अचूकपणे समजून घेण्यास मदत झाली. त्यातून विधानपरिषदेत घरेलू कामगारांसाठी विधेयक मांडण्यात आले, त्यावेळी वास्तव मांडता आले.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, हे विधेयक मंजूर करताना घर कामगारांसाठी कल्याण मंडळ सुरू करण्याची संकल्पना देखील मांडली. समाजातील अवघड कामे घर कामगार मंडळी करत असतात. त्यांच्याप्रती समाजाने आदराची आणि सन्मानाची भावना कायमच ठेवली पाहिजे.गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घर कामगार करणाऱ्या वर्गाच्या दृष्टीने हिताचे असणारे अनेक निर्णय घेतले. या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी केल्याने कामगार वर्गाला फायदा झाल्याचे दिसून येत आहे, याकडे डॉ गोऱ्हे यांनी लक्ष वेधले.घर कामगार करणाऱ्या महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने सावध रहावे, स्वतःला कणखर बनवावे, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे मार्गदर्शन करतानाच अनेक घटनांमध्ये महिला कामगारांना त्रास देणाऱ्या लोकांना शिक्षा झालेली आहे, हे डॉ गोऱ्हे यांनी उपस्थित घरेलु कामगारांच्या निदर्शनास आणून दिले आणि त्यांच्यातील आत्मविश्वास जगवला. राज्यातील सर्वच घरकाम करणाऱ्या महिला या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाल्या आहेत, असे सांगून डॉ गोऱ्हे म्हणाल्या, या सर्वच महिलांना अभिमान वाटावा असा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने घेतला आहे. स्वतःच्या नावापुढे वडीलांप्रमाणेच आईचे नाव लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन महायुती सरकारने महिलांचा समाजातील सन्मान वाढवला आहे.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी, सर्वांना मान ताठ करून जगण्यास शिकवले. तोच आदर्श घेऊन सावित्रीबाई फुले घरेलू कामगार संघटना काम करत आहे. मराठे दाम्पत्याने घर कामगारांच्याबाबतीत वाखाणण्याजोगे काम केले आहे, अशा शब्दात डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here