महाविकास आघाडीने आमच्या योजना चोरल्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
13

 

महायुतीचे छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा

पुणे

महायुतीने राज्यातील जनतेचा विचार करून केलेल्या त्यांच्या हिताच्या योजना महाविकास आघाडीने चोरून त्याचा समावेश आपल्या जाहीरनाम्यात केल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विरोधक हे दुतोंडी असून समाजात ते जातीजातींमध्ये द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, त्यामुळे त्यापासून आपण सावध राहायला हवे, असे ते यावेळी म्हणाले.

छत्रपती शिवाजीनगर मतदार विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन गोखलेनगर परिसरातील शहीद तुकाराम ओंबळे मैदानावर करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कोथरूड मतदार संघातील महायुतीचे उमदेवार चंद्रकांत पाटील, कसबा मतदार संघातील महायुतीचे उमदेवार हेमंत रासने, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, आरपीआय (आठवले) गटाचे परशुराम वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये असताना त्यांनी विकास बंद पाडला होता. २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होती. पण सत्ता मिळवण्यासाठी अनैसर्गिक आघाडी झाली आणि त्यामधून महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले. जेव्हा हे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेमध्ये होते, तेव्हा राज्याचा विकास पूर्णपणे थांबला होता.” महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर भाजपच्या अनेक आमदारांनी वनवास दूर केल्याची भावना आपल्याकडे व्यक्त केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

महायुतीचे सरकार सत्तेमध्ये आल्यापासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक कॅबिनेट बैठकीत सरकारने जनहिताचे निर्णय घेतले आहेत. सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेले काम जनतेच्या हिताचेच राहिले आहे. युती सरकारच्या काळात सुरु झालेली लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न सावत्र भावांनी केल्याची टीका यावेळी शिंदे यांनी केली. विधानसभेचे मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणारा असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.

सिद्धार्थ शिरोळे हे लोकप्रिय, आदर्श आणि कार्यसम्राट आमदार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याने विधानसभेत केलेल्या कामाचे कौतुक केले. शिरोळे यांच्या घराला राजकीय वारसा आहे, त्यांचे वडील पुण्याचे खासदार होते हे सांगताना पुण्यातील सुज्ञ मतदार पुन्हा त्यांना विधानसभेत पाठवतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुण्याकडे विशेष लक्ष आहे, म्हणून त्यांनी खासदार मुरलीधर मोहोळ यांची मंत्रीपदी नियुक्ती केली आहे. पुण्यात मेट्रोचा विकास होत आहे, इतकेच नाही तर उद्योग क्षेत्रात देखील ते पुढे चालले आहे. इथला वाहतुकीचा प्रश्न सोडवून पुणे हे ट्रॅफिकमुक्त करायचे असल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. आमचे सरकार हे ‘कॉमन मॅन’चे सरकार आहे, त्यामुळे भविष्यात देखील त्याच पद्धतीने जनतेच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

सिद्धार्थ शिरोळे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या मतदार संघात केलेल्या कामाचा आढावा घेतला. पुणे विद्यापीठ चौकामध्ये सुरु असणारे उड्डाणपुलाचे काम वेगात सुरु असून येत्या जानेवारी महिन्यात त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महायुतीमधील घटक पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here