झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझ्या जीवनाचा ध्यास,साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे घर देणार : रमेश बागवे

0
8

 

कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा माझा जीवन ध्यास आहे. प्रत्येक झोपडपट्टीवासीयास त्याच जागी साडेपाचशे चौरस फुटांचे हक्काचे मोफत घर देण्यास मी कटिबद्ध आहे, असे आश्वासन पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांनी रविवारी दिले.
रमेश बागवे यांच्या प्रचारासाठी काशेवाडी आणि परिसरात निघालेल्या पदयात्रेचे रविवारी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यापूर्वी नगरसेवक,आमदार आणि मंत्री असताना झोपडपट्टीवासियांना वीज, पाणी, स्वच्छतागृहे या मूलभूत नागरी सुविधा मी उपलब्ध करून दिल्या होत्या. पुढील पाच वर्षांत झोपडपट्टीवासियांना हक्काची पक्की घरे, आरोग्य , शिक्षण, पाणी या मूलभूत सुविधांसह रोजगार देण्याचा मी प्रयत्न करणार आहे , असे आश्वासन बागवे यांनी दिले.
तरुणांना आणि महिलांना रोजगार देण्यासाठी तसेच खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फुले-शाहू-आंबेडकर, मौलाना आझाद, अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद यांचे विचार रूजवून जातीय व धार्मिक सलोखा जपण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.
काशेवाडीतील पतसंस्थेपासून सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात झाली. व्यापारी मंडळ, धम्मपाल गल्ली, मेमजादे अपार्टमेंट, विशाल मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ, सिद्धार्थ नगर, दीपज्योत बंधुभाव मित्र मंडळ, म्हसोबा मंदिर, सेवक तरुण मंडळ चमनशाह चौक, शहीद अब्दुल रहेमान चौक, एसआरए राजीव गांधी हाउसिंग सोसायटी येथे पदयात्रा उत्साहात पार पडली. सायंकाळी वानवडी परिसरात निघालेल्या पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. गवळी धाडगे नगर, फातिमा कॉन्वेंट, साबळे वस्ती, वानवडी गाव, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, मदली तालीम, विकास नगर, येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत पदयात्रा पार पडली.
माजी नगरसेवक अविनाश बागवे, रफीक शेख, पल्लवी जावळे, उत्तमराव भुजबळ, जावेद खान, जुबेर शेख, कनव चव्हाण, संगीता दामजी, सुरेखा खंडाळे, उस्मान तांबोळी, भीमराव पाटोळे, पप्पू जाधव यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध संघटना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पेढे वाटून आणि फटाके फोडून स्थानिक कार्यकर्त्यांनी रमेशदादा बागवे यांचे स्वागत केले. काशेवाडी आणि वानवडी परिसरातून रमेशदादांना भरघोस मतदान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी व्यक्त केला. एकच वादा रमेशदादा या घोषणेने परिसर दणाणून गेला.ठिकठिकाणी महिलांनी रमेशदादा यांचे औक्षण करून स्वागत केले. रमेशदादा हेच आमचे लाडके भाऊ आणि आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here