पोटनिवडणुकीतील विजयानंतर आमदार म्हणून काम करण्याची मला केवळ सोळा महिन्याची संधी मिळाली पण, या अल्पावधीत मी पुणेकर आणि विशेषतः कसबा मतदार संघातील नागरिकांशी संबंधित 316 प्रश्न आणि असंख्य लक्षवेधी सूचना उपस्थित करून पुणेकरांचा आवाज बुलंद करण्याचे काम मी केले. त्यातून अनेक प्रश्न प्रत्यक्ष मार्गी लागले याचे समाधान आहे, असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
धंगेकर यांच्या सध्या कसबा मतदार संघात झंजावाती प्रचार यात्रा सुरू असून त्या दरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
धंगेकर म्हणाले की, महापालिकेकडून घर मालकांना देण्यात येणारी 40% कर सवलत रद्द केल्यामुळे त्याबाबतची लक्षवेधी मी आग्रहाने उपस्थित करून पुणेकरांच्या महत्त्वाच्या प्रश्नाला वाचा फोडली. पुण्यातील मध्यमवर्गीय व गरिबांची 500 चौरस फुटाची घरे मिळकत करातून माफ करण्यात यावीत यासाठी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून शासनाकडे आग्रह धरला. रिक्षा चालक व मालकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेच्या मागणीसाठी आग्रह धरला, पुणे शहराला 22 टीएमसी पाणी मिळावे यासाठी लक्षवेधी उपस्थित केली. शहरातील ड्रग्स तस्करी, अवैध पब आणि हुक्का बार या संदर्भातील आक्रमक भूमिका मांडून पोलीस यंत्रणेला त्याच्या विरोधात कडक कारवाई करायला भाग पाडले. शहरातील हेरिटेज वास्तूमुळे जुन्या वाड्यांच्या पुनर्वसनाला जो अडथळा निर्माण झाला आहे त्या संदर्भात मी कायमच आग्रही राहिलो. या चारही अधिवेशनात माझी सरासरी उपस्थिती सुमारे 90% इतकी होती. पुढील पाच वर्षात इतक्याच आक्रमकपणे काम करून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी सर्वाधिक निधी आणण्याचे काम आपण करणार आहोत आणि कसबा मतदार संघातील नागरिकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी आपण या पाच वर्षात नोंदवू असे प्रतिपादन धंगेकर यांनी यावेळी केले.
आज सकाळी प्रभाग क्रमांक 19 मध्ये धंगेकर यांनी महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांसह प्रचार यात्रा काढली. यावेळी लोहिया नगर मधील सर्व गल्यांमध्ये तसेच एकबोटे कॉलनी मध्ये प्रचार यात्रा काढण्यात आली. या प्रचार यात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना सर्वच स्थानिक वक्त्यांनी धंगेकर यांना असे आश्वासन दिले की, धंगेकर यांच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत या प्रभागाने त्यांना कायमच मताधिक्य दिले आहे. यावेळी त्याहीपेक्षा अधिक मताधिक्य त्यांना देऊ अशी ग्वाही या वक्त्यांनी दिली.
यावेळी अविनाश बागवे, यासेर बागवे, युसुफ शेख,संजय गायकवाड, जुबेर दिल्लीवाला, हेमंत राजभोज, गणेश नलावडे, रवी पाटोळे, आयुब पठाण, विजया मोहिते, मनोज यादव, इत्यादी सहभागी झाले होते.