बिबवेवाडीतील ईएसआयसीच्या जागेवर सर्व सुपर स्पेशालिटी आरोग्य सुविधांनी परिपूर्ण 500 खाटांचे रुग्णालय दक्षिण पुण्यासाठी वरदान ठरेल असा विश्वास पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ बिबवेवाडी, अप्पर सुपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज, 276 ओटा, अप्पर डेपो परिसर या भागात प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. दीपक मिसाळ, माजी नगरसेवक रूपाली धाडवे, वर्षा साठे, विनीत पिंगळे, अजय भोकरे, अविनाश खेडेकर, बाबुराव घाडगे, स्वप्निल माकुडे, अविनाश कुलकर्णी, विक्रम फुंदे, सचिन मारणे, राहुल पाखरे, मीनानाथ पराडकर, वैभव देवकर, गणेश अर्जुने यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून ईएसआयसी अर्थात कामगार विमा रुग्णालयाच्या 16 एकर जागेत सात मजली इमारतीत 500 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाची उभारणी सुरू आहे. पर्वती बिबवेवाडी, मार्केट यार्ड, सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना दर्जेदार, अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत. सध्या येथे 150 खाटा असून आता शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. कामगारांसाठी 100 खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.”
मिसाळ म्हणाल्या, “अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, बाह्य आणि सर्व प्रकारच्या आंतररुग्ण सुपरस्पेशालिटी सुविधांसाठी स्वतंत्र कक्ष, साधारण व अतिदक्षता कक्ष या रुग्णालयात असणार आहेत. रेडिओलॉजी, बायोकेमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी अशा विविध प्रयोगशाळांची सुविधा मिळणार आहे. कोरोना काळात आमदार निधीतून या रुग्णालयातून ऑक्सिजन प्लाँट आणि व्हेंटिलेटर पुरविण्यात आले होते.”
मिसाळ पुढे म्हणाल्या, “प्रत्येक निवडणुकीत ससूनच्या धर्तीवर रुग्णालय उभारू अशी घोषणा काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून केली जात होती. पण ती कधीही प्रत्यक्षात आली नाही. परंतु केंद्र सरकारच्या मदतीने आम्ही ती प्रत्यक्षात आणली. तसेच भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावने पुणे महापालिकेचे पहिले वैद्यकीय महाविद्यालय आम्ही कार्यान्वित केले.”