महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य करू : मल्लिकार्जुन खरगे

0
7

 

राज्यात सोयाबिन आणि कापसाला दर नाही. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी लुटारूंना मदत केली जात आहे. महाविकास आघाडीने पंचसूत्री कार्यक्रम पुढे ठेवला असून सोयाबिनला सात हजार रुपये दर देण्यात येणार आहे. काँग्रेस शासित राज्यात कल्याणकारी योजना यशस्वीपणे लागू करून दाखवल्या आहेत. महाविकास आघाडी महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकाचे राज्य करून दाखवेन, असा विश्वास काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सरकार चालवायला खोक्यांची नाही तर डोक्याची गरज असते. आमच्याकडे डोके आहे, असा टोला त्यांनी खोके सरकारला लगावला. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आलेल्या खरगे यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील महायुती सरकारवर सडकून टीका केली. छत्तीसगढचे माजी उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद, शहराध्यक्ष अरविंद शिंदे इत्यादी उपस्थित होते.

गेल्या १४ महिन्यात महागाई वाढली आहे. बेरोजगारी आणि गुंतवणूक याकडे लक्ष देण्याऐवजी महाराष्ट्रातील उद्योग पळवले जात आहेत. गुजरातचा विकास करा, पण महाराष्ट्रातील उद्योग का पळवता ? पं. नेहरू, इंदिरा व राजीव गांधी यांच्या नावांवरून टीका करणारे मोदीजी जिवंतपणी मैदानाला स्वत:चे नाव कसे लावता, असा सवाल खरगे यांनी केला. खरगे म्हणाले, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, विविध राज्यातील भाजपचे मुख्यमंत्री, भाजपचे नेते महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. एका राज्यासाठी सरकारला इतकी शक्ती लावावी लागत आहे. मोदी महाराष्ट्रात फिरून विकासावर बोलण्याऐवजी नेहमीप्रमाणे काँग्रेसवर टीका करीत आहेत. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आले आणि राहुल गांधी पंतप्रधान झाले, अशा भीतीतून त्यांनी गांधी कुटुंबीयांवर टीका केली. तशीच टीका आताही सुरू असून राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत का ? राज्यातील शेतकरी, तरुणांना काय देणार आणि विकास कसा करणार, याबद्दल बोला.

ते पुढे म्हणाले, बटेंगे तो कटेंगे घोषणा दिली जात आहे पण देश एकसंध ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. महात्मा गांधी, इंदिरा व राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. संघ आणि भाजपच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी काय केले ? राज्य घटना जाळणारे, कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्यास नकार देणारे, मनूच्या विचारांवर घटना लागू करा म्हणाऱ्या भाजपच्या लोकांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेची आठवण आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात घेऊन राज्यसभेचे खासदार करता, तुरुंगात टाकलेल्या आणि धमकी दिलेल्या नेत्यांना जवळ करता. मोदीजी तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काय अधिकार आहे ? शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, राम मंदिर आणि संसद गळत आहे. नरेंद्र मोदी यांना सगळे स्वत:च्या नावाने आणि आणि लवकर करायचे आहे, अशी टीका खरगे यांनी केली.

२ कोटी नोकऱ्या, पंधरा लाख कुठे आहेत ? नोटाबंदीमुळे भ्रष्टाचार, दहशतवाद आणि नक्षलवाद कुठे संपला आहे, असा सवाल त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here