शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित ‘विठू माऊली माझी’ कार्यक्रमात रसिकांनी केला विठू माऊलीचा गजर
विठ्ठल रूपाशी एकरूप झालेल्या संतांना ज्ञानदृष्टीने अनुभवास आलेला ज्ञानियांचा राजा विठ्ठल, त्याला मातृरूपात पाहताना केलेला हट्ट, त्याचे लेकुरवाळे वर्णन करणाऱ्या संतरचना ऐकून रसिकांनी भक्तीरसाची अनुभूती घेतली. निमित्त होते ‘विठू माऊली माझी’ या कार्यक्रमाचे! शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त आज (दि. 12) ‘विठू माऊली माझी’ या अभंगवाणी कार्यक्रमाचे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून कार्यक्रमाचे यंदाचे 25 वे वर्ष आहे.
प्रियल साठे, मेहेर परळीकर आणि सचिन इंगळे यांनी रचना सादर केल्या तर अमृता ठाकूरदेसाई, सचिन वाघमारे, डॉ. राजेंद्र दूरकर, केदार मोरे, राजेंद्र साळुंके यांनी साथसंगत केली. संगीत संयोजन सचिन इंगळे यांचे होते तर भावपूर्ण निरूपण रवींद्र खरे यांनी केले.
विठू माऊली माझी’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय जय राम कृष्णी हरी’ या गजराने झाली. यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेला ‘रूप पाहता लोचनी’ अभंग ऐकताना रसिकांना त्या सावळ्या विठ्ठलाचे अनुपम दर्शन घडले. संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा’ रचनेतून माऊलीरूपी विठ्ठल आपल्या संतरूपी अपत्यांची कशी काळजी घेतो याची प्रचिती आली. नियमांचे बंधन सांभाळणाऱ्या विठुरायाचे वर्णन दर्शविणारा ‘अनुपम्य मनोहर’ हा अभंग रसिकांना विशेष भावला.
‘पंढरपूरचा निळा’, ‘रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा’, ‘रंगा येई वो’, ‘पंढरीचे भूत मोठे’, ‘भेटी लागी जीवा’, ‘झाला महार पंढरीनाथ’, ‘आता कोठे धावे मन’, ‘सावळा नंदाचा’, ‘काळ देहासी आला’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘वृंदावनी वेणू’ या मराठी संत रचनांसह ‘गुरूकृपा अंजन’, ‘कंकड चुन चुन’, ‘म्हारे घर आवोजी’, ‘अनाडी दुनिया’ या संत रचनाही कलाकारांनी प्रभावीपणे सादर केल्या.
‘अवघा रंग एक झाला’ या रचनेने कार्यक्रमाची सांगता झाली. अनेक भावपूर्ण रचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद देत नुसतीच टाळ्यांची साथ केली नाही तर पसंतीत पडलेल्या भक्तीरचनांना पुन्हा पुन्हा गाण्याचा प्रेमळ आग्रहही कलाकारांकडे केला.ओघवत्या शैलीत निरूपण रसिकांना भावले संत रचना या बुद्धीला-चित्ताला चालना देणाऱ्या, चित्तात चैतन्य जाग्या करणाऱ्या, मोहमायेच्या दुनियेत अडकून पडलेल्या मनाला योग्य दिशा दाखविणाऱ्या असतात. संतांनी त्यांच्या रचनांमधून जनसामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवित मार्गदर्शन केले. देवाकडे पाहताना ज्ञानदृष्टीने जाणून घ्यावे, चंचल मनाला स्थिर करावे, अवगुण सोडून नियमांचे बंधन पाळत चालावे, परमेश्वराशी जवळीक साधताना त्याला मातृरूपामध्ये पाहत हट्टही करावा, गुरूकृपेची महती जाणावी अशा ओघवत्या वाणीत प्रत्येक संतरचनेचे रवींद्र खरे यांनी निरूपण केले.