हडपसरला वाऱ्यावर सोडणाऱ्या चेतन तुपेंना घरी पाठवायचेय : जयंत पाटील 

0
12

प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमध्ये जाहीर सभा

शरद पवारसाहेबांनी हडपसरच्या विकासासाठी चेतन तुपे यांना संधी दिली होती. मुंढवा-केशवनगर दोन मतदारसंघांच्या मध्यभागी आहे. त्यामुळे इकडे चेतन तुपे आणि तिकडे सुनील टिंगरे या दोन गद्दार आमदारांनी लावलेल्या दिव्यांमुळे तुमच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिलेला आहे. या समस्या सोडवण्याची जबाबदारी महापौर म्हणून प्रभावी काम केलेल्या प्रशांत जगताप यांनी घेतली असून, त्यांना हडपसरच्या प्रतिनिधित्वाची संधी द्यायची आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ केशवनगरमधील झेड कॉर्नर येथे आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. प्रसंगी प्रशांत जगताप यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवती अध्यक्षा सक्षणा सलगर, माजी उपमहापौर बंडुतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी’चे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, विजय देशमुख, दिलीप तुपे, निलेश मगर, यशवंतराव गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “मतदारसंघात तीनशे कोटी आणल्याचे चेतन तुपे म्हणतात. पण त्यातून काम तर काहीच दिसत नाही. मग हे पैसे गेले कुठे? याचा जाब जनतेने विचारावा. गेल्या पाच वर्षात शहराला न्याय देऊ शकले नाहीत. मतदारसंघातील एकही प्रश्न त्यांना सोडवता आलेला नाही. ज्यांनी सर्वकाही दिले, त्यांच्या वयावर टीका करीत गद्दारी केली. शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांच्या मांडीवर जाऊन ते बसलेत. म्हणून निष्ठेने काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तुमच्या आशीर्वादाने त्यांना विधिमंडळात पाठवायचे आहे. या मतदारसंघातील सर्व प्रश्न सोडवण्याचा आराखडा आणि इच्छाशक्ती त्यांच्याकडे आहे.”
“लोकसभेत फटका बसल्यानेच शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाने राज्याच्या तिजोरीचे दारे बाजूला ठेवून घोषणांचा पाऊस सुरु केला. सगळेच लाडके असल्याचे सांगत प्रसिद्धीसाठी वारेमाप पैशांची उधळपट्टी केली. राज्यावर लाखो कोटींचे कर्ज केले आहे. मात्र, हे लोक २० नोव्हेंबरपर्यंतच लाडक्या बहिणी म्हणणार आहेत. त्यानंतर त्या लाडक्या राहणार नाहीत. सल्लागारांच्या भरोशावर हे राज्यकर्ते काम करत आहेत. मागच्या अडीच वर्षात महायुती सरकारने महागाई दिली. जीएसटीचा बोजा लादला. समस्यांचा डोंगर उभा केला. कराच्या माध्यमातून वर्षाला तुमच्याकडून लाखभर रुपये वसूल करून वर्षाकाठी तुम्हाला सात-आठ हजार रुपये देतात आणि स्वतःचा ऊर बडवून घेताहेत, हे दुर्दैवी आहे,” अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
“आमचे घड्याळ चोरून नेणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने चिन्हाखाली ‘न्यायप्रविष्ट’ लिहिण्याची सक्ती केली. हे जगातील पहिलेच उदाहरण असावे. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष जन्माला घातला, त्यांना त्यापासून तोडण्याचे पाप भाजपने केले. त्यामध्ये ज्यांना आम्ही मोठे केले, तेच लोक होते. मात्र, आजही ८४ वर्षांचा हा योद्धा दिवसाला चार-पाच सभा घेतो. त्यांचा उत्साह, जिद्द आपल्याला प्रेरणा देणारी आहे. आपल्यासाठी थांबलेल्या लोकांना भेटण्यासाठी अंधार पडला, तरी हेलिकॉप्टर सोडून मोटारीने सभेला जाण्याची त्यांची इच्छाशक्ती महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारी आहे.त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवा,” असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.
“हडपसरमध्ये तुपे अधिक आहेत. चेतन तुपे सोडून इतर सर्वच तुपे पवार साहेबांच्या पाठीशी येत आहेत. त्यामुळे गद्दारी केलेल्या लोकांना घरी पाठवून प्रायश्चित द्यायचे आहे. प्रशांत जगताप आघाडीवर आहेत. पुढचा आमदार तेच होणार आहेत आणि हडपसरचा विकास फुले, शाहू आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जात संविधानाचे महत्व अबाधित ठेवण्याचे काम प्रशांत जगताप करणार आहेत. महाराष्ट्राला अग्रस्थानी घेऊन जायचे असेल, पुण्याचे व हडपसरचे वैभव परत मिळवायचे असेल, तर आपल्याला महाविकास आघाडीला निवडून द्यावे लागेल. आपले चोरलेले घड्याळ बंद पाडून आपल्याला तुतारी फुंकायची आहे. आमदार झाल्यावर पवार साहेब त्यांना चांगली जबाबदारी देतील, जेणेकरून हडपसरकारांची मान अभिमानाने उंचावेल,” असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.
जयंत पाटील पुढे म्हणाले, “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारून राज्य मोदी-शहांच्या दावणीला बांधले आहेत. हे लोक त्यांच्यासमोर चकार शब्दही काढत नाहीत. त्यामुळे दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडला असून, ११ व्या स्थानी फेकला गेला आहे. या अपयशाचे धनी फडणवीस आहेत. महाराष्ट्राला पिछाडीवर घेऊन जाण्याचे पाप यांनी केले आहे. राज्य अधोगतीकडे जात असून, कर्जबाजारी होत आहे. आजघडीला महाराष्ट्रावर नऊ लाख कोटींचे कर्ज आहे. शिवतीर्थावर झालेल्या मोदींच्या सभेला माणसे नाहीत. शिराळ्यात अमित शहांच्या सभेला माणसे नाहीत. जनता यांच्याकडे पाठ फिरवू लागली आहे. भ्रष्ट सरकारमुळे महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणमध्ये पुतळा कोसळला. यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे.”
प्रशांत जगताप म्हणाले, “गेल्या पाच वर्षात हडपसरच्या नागरिकांना काय मिळाले, याचा विचार करा. चार वर्षे सत्तेत राहूनही तुपे यांना प्रश्न सोडवता आलेले नाहीत. मुंढवा-केशवनगर, मांजरी या ठिकाणी वाहतूक कोंडी, पाणीटंचाईची मोठी समस्या आहे. गुन्हेगारी, ड्रग्जमाफी, कोयता गॅंगमुळे हडपसरचे नाव बदनाम झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी अकार्यक्षम, गद्दार आमदाराला घरी बसवायचे आहे. पवार साहेबांच्या नावावर निवडून येऊनही चेतन तुपे यांनी पक्षाशी गद्दारी केली. या संघर्षाच्या काळात आम्ही पवार साहेबांची साथ सोडलेली नाही. याच निष्ठेचे आणि माझ्या कामाचे फळ मला मिळालेली उमेदवारी आहे. पवार साहेबांविषयी वाईटसाईट बोलणाऱ्या तुपे यांना धडा शिकवायचा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here