हडपसरचा सर्वांगीण विकास करून स्मार्ट शहर बनवण्याचे माझे स्वप्न आहे. पाणीटंचाई, वाहतूककोंडी, गुन्हेगारीमुक्त हडपसर करण्यासाठी स्वतंत्र महापालिका यासाठी माझे प्राधान्य राहणार आहे. मतदारसंघात चांगल्या शिक्षणसंस्थांना प्रोत्साहन देऊन, रोजगारक्षम पिढी घडवण्यासह त्यांना नोकऱ्या उपलब्ध होण्यासाठी औद्योगिक प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्नशील राहील,” असे हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांनी आश्वस्त केले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक भागाचा दौरा करीत तेथील नागरिकांच्या भेटीगाठी घेण्यावर प्रशांत जगताप यांनी भर दिला आहे. शनिवारी त्यांनी कोंढवा खुर्द भागातील भैरवनाथ मंदिर, कोंढवा खुर्द गावठाण, शिवनेरीनगर, नवाजिस पार्क, साईबाबानगर, कौसरबाग या भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांसोबत संवाद साधला. कोंढवा भागात बाईक रॅली काढून प्रचार केला. महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारा, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. सर्वच ठिकाणी जगताप यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करीत विजयाचा आशीर्वाद दिला.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले की,हडपसरला विकासाभिमुख नेतृत्वाची गरज आहे. विद्यमान आमदारांनी गेल्या पाच वर्षात कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही. नागरिकांकडे, त्यांच्या समस्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. जनतेसाठी उपलब्ध नसलेल्या या निष्क्रिय व पवार साहेबांशी गद्दारी केलेल्या आमदाराला घरी बसवून माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला हडपसरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तुम्ही सर्वजण मला द्याल, असा विश्वास वाटतो. हा मतदारसंघ कॉस्मोपॉलिटन आहे. विविध जाती-धर्माचे लोक इथे राहतात. या सर्वांना सोबत घेऊन सामाजिक एकोप्याने आपल्याला पुढे जायचे आहे.
“वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आपल्याला रस्त्यांचे रुंदीकरण, सिग्नलविरहित कॉरिडॉरची उभारणी, मेट्रोचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यावर भर देईल. कचऱ्याचे वर्गीकरण व व्यवस्थापन, नियोजित पाणीपुरवठा, आरोग्य केंद्रांची उभारणी, समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक सुविधांचे जाळे, आयटी हब व औद्योगिक केंद्रांना प्रोत्साहन, हरित व स्वच्छ हडपसरचे नियोजन, समाजाभिमुख व पारदर्शी प्रशासन अशा अनेक गोष्टी प्राधान्याने मार्गी लावणार आहे. २४ तास पाणी पुरवठ्यासाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रकल्प, तसेच महिला सुरक्षा, गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आवाज उठवणार आहे,” असे प्रशांत जगताप यांनी नमूद केले.