सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर समाजाची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपचे नेते जाती-धर्मावरून लोकांमध्ये भांडणे लावत आहेत. भाजपने देशात द्वेष पेरण्याचे काम केले आहे. भाजपने विकासकामांचा प्रचार करून मते मागितली असती तर खेळाडू म्हणून मी देखील भाजपला दाद दिली असती,असे मत हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सोमवारी व्यक्त केले.
काँग्रेस भवन येथे विनेश फोगट यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे यावेळी उपस्थित होते.
फोगट म्हणाल्या, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. महाराष्ट्रात शेतकरी आणि सामान्य माणूस भरडला जात आहे. महिलांवर अत्याचार वाढले आहेत. भाजप आणि महायुती सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाहीत.
भाजपचे नेते एक हैं तो सेफ हैं ही घोषणा देतात. दुसरीकडे देशातील महिला सुरक्षित नाहीत. नेते महिलांचे शोषण थांबवतील तेव्हा महिला सुरक्षित होतील. या अशा नेत्यांकडून महिला खेळाडूंना शोषणाला बळी पडावे लागले आहे.
सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत.
महायुती सरकार सामान्यांच्या कल्याणासाठी काम करत नाही. या सरकारचे खेळाडूंना प्रोत्साहन मिळत नाही. भाजप सत्तेत येण्याआधी देशातील निवडणूक चांगल्या वातावरणात व्हायच्या. भाजपने द्वेष पेरल्यामुळे राजकारणाची पातळी खालावली आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर विभागणी करण्याचे काम सुरू आहे. देशामध्ये द्वेष पेरण्याचे काम भाजपने केले आहे. हिंदू-मुस्लिम भेद करून निवडणूक जिंकता येत नाही. निवडणूक विकासावर जिंकता येते. भाजपने मतांसाठी विकासाचा प्रचार केला असता तर खेळाडू म्हणून मीही दाद दिली असती.
निवडणूक जवळ आली की लाडकी बहीण आठवते. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून शंभर फुटांच्या अंतरावर महिला शोषणाविरोधात आवाज उठवत होत्या तेव्हा भाजपला बहिणीची आठवण आली नाही.
मतांसाठी निवडणुकीच्या आधी तीन महिने लाडकी बहीण योजना लागू करणे , हा भाजपचा लोकांना फसविण्याचा डाव आहे.
मी राजकारणात मोठे स्वप्न घेऊन आलेले नाही. खेळाडू म्हणून लैंगिक शोषणाविरोधात संघर्ष केला. ही लढाई कोणत्याही खेळाडूला लढावी लागू नये म्हणून मी राजकारणात आले आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही संघर्ष केला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना नागरिकांनी विसरू नयेत. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फोडण्याचे काम भाजपने पैशांच्या जोरावर केले. सरकारच्या विरोधात बोलले म्हणून भाजपमुळे आम्ही देशद्रोही ठरलो आहोत.