धनुष्यबाण चिन्हावर लढणाऱ्या निलेश राणेंना निवडून द्या
कोकणाला विकासाची दृष्टी देण्याचे काम माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले आहे. याच राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचे भाग्य लाभले आहे आणि शिवसेना ते शिवसेना हे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे, असे सांगतानाच लोकशाही आणि या निवडणुकीचे हेच वैशिष्ट्य आहे असे प्रतिपादन शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ विधानसभा मतदारसंघात डॉ निलेश राणे यांचा प्रचार करताना डॉ गोऱ्हे यांनी सांगितले की, राजकीय मतभेद झाले असतील पण आजही नारायण राणे यांच्या मनात शिवसेनाप्रमुख आणि हिंदूहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर कायम आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, कुडाळ मालवण निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राणे कुटुंबातील सदस्याला शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून देण्याचा योग कोकणवासीयांना लाभला आहे. यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी आणि रणनीती असल्याचे डॉ गोऱ्हे म्हणाल्या.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की काश्मीरमधील लाल चौकात भगवा फडकावा, ते स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पूर्ण केले, असे सांगून डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, बाळासाहेब यांचे स्वप्न साकार करण्याचे काम राज्यातील महायुतीचे सरकार करत आहे. देश जसा मोदींच्या हातात सुरक्षित आहे, तसेच राज्य देखील एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या हातात सुरक्षित आहे, असा विश्वास डॉ गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या, निलेश राणे हे तरुणपणापासूनच या मतदारसंघात लोककल्याणाचे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वी खासदार म्हणून देखील येथे उत्कृष्ट काम केले आहे. आपल्या कामातून निलेश राणे यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
कोकणात आल्यावर श्री राणे यांनी सुरू केलेल्या सिंधू महोत्सवाची आठवण आल्याशिवाय रहावत नाही. महिला, चाकरमानी आणि श्रमिकांसाठी नारायण राणे यांनी महत्त्वाचे काम केले आहे. आता सभागृहात कोकणातील समस्यांना वाचा फोडायची असेल, प्रश्नांवर परखड मत मांडण्यासाठी व ते मार्गी लावण्यासाठी निलेश राणे यांच्यासारख्या तरुण तडफदार व अभ्यासू उमेदवाराला आमदार करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
यावेळी नारायण राणे यांनी सांगितले की, शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याने या विभागातील विद्यार्थी कोकणच्या गुणवत्ता यादीत झळताना दिसतात. या भागाचा विकास करण्याची संधी मला येथील जनतेने दिली. त्यांना न्याय देत जनतेसाठी पाणी, शाळा, उद्योगधंदे आणण्याचे काम केले. येथील रस्त्यांचा प्रश्न देखील मार्गी लावला, या भागाच्या विकासाकरिता ३५ वर्ष सतत झगडत राहिलो. त्यामुळे या तालुक्याचा कायपालट करता आला.
ते म्हणाल की, इथून पुढच्या काळात देखील नितेश आणि निलेश हे दोघही या भागाच्या विकासाकरिता कायम लढा देत राहतील. मतरुपी आशीर्वाद देऊन दोघांना प्रचंड मतांनी निवडून विधानसभेत पाठवावे असे आवाहन नारायण राणे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार केला. जवळपास १२ कोटी गरीब लोकांना पक्की घरे दिली, जवळपास साडेअकरा कोटी कुटुंबांच्या घरामध्ये नळाने पाणी पोहोचविले. पंतप्रधान मोदींनी खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेचा विकास केला असल्याचे राणे यांनी सांगितले.
या प्रसंगी नारायण राणे, अभय सावंत (जिल्हा प्रमुख भाजपा), संदीप कुर्तडकर, प्रभाकर सावंत (जिल्हाध्यक्ष भाजपा), संजय वेंगुर्लेकर, श्वेता कोरगावकर (जिल्हाप्रमुख भाजपा), वर्षाताई कुडाळकर (जिल्हाप्रमुख शिवसेना) व इतर मान्यवर उपस्थित होते.