महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपाने १३२ जागा जिंकल्या आहेत आणि भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महायुतीला २३४ जागा मिळाल्या आहेत. याबाबत आता संजय राऊत यांनी पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली आहे. जे काही घडलं त्याला धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत असा आरोप केला आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीची लढाई बरोबरीत सुरु होती. पण नंतर पुढच्या दोन तासांत सगळं चित्र बदललं. निकाल आधीच ठरला होता फक्त मतदान करुन घेतलं, मतदान होऊ दिलं. तसंच जे काही घडलं त्याला देशाचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार आहेत. त्यांनी सरन्यायाधीश असताना जर वेळेवर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल दिला असता तर या गोष्टी घडल्याच नसत्या. तुम्ही निकाल देणार नसाल तर मग त्या खुर्च्यांवर का बसला होता? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
धनंजय चंद्रचूड हे उत्तम प्रोफेसर किंवा बाहेर भाषणं द्यायला चांगले आहेत. मात्र सरन्यायाधीश म्हणून त्यांनी घटनात्मक पद्धतीने निर्णय दिला नाही. यासाठी इतिहास त्यांना माफ करणार नाही. जर चंद्रचूड यांनी योग्य निकाल दिला असता तर महाराष्ट्रातलं चित्र बदललं असतं. आज जे चित्र दिसतंय ते नक्कीच दिसलं नसतं. चंद्रचूड यांनी निर्णय न दिल्याने पक्षांतराच्या खिडक्या ते उघड्या ठेवून गेले आहेत.आत्ताही कुणीही कुठेही कशाही उड्या मारु शकेल, आमदार विकत घेऊ शकेल. कारण दहाव्या सूचीची भीतीच राहिली नाही. न्यायमूर्तींनीच ती भीती घालवली.जी काही दुर्घटना महाराष्ट्रात झाली त्याला जस्टिस चंद्रचूड जबाबदार आहेत. इतिहासात त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहिलं जाईल.