श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे काळभैरवनाथ जयंती (जमाष्टमी) निमित्त श्री भागवत कथा सप्ताहाचे आयोजन
भगवंत एकच आहे, तो वेगळा नाही. त्याच्याकडे जाताना त्याची भक्ती करताना तुम्ही जसे आहात तसे त्याच्याकडे जा. अहंकार, अज्ञानाचे वस्त्रहरण करून त्याच्याकडे जावे. तो आपल्या अंतरंगात वसला आहे, असे मत कथाकार आनंद जोशी यांनी व्यक्त केले.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ जयंती (जमाष्टमी) निमित्त श्री भागवत कथा सप्ताहाचे आयोजन मंदिरात करण्यात आले. यावेळी कथाकार आनंद जोशी यांनी भगवान श्रीकृष्ण, कृष्णाच्या बाललीला, ब्रह्मदेव आणि श्रीकृष्ण, वेणू गीत या कथेचे निरुपण केले.
आनंद जोशी म्हणाले, भगवंताच्या बासरी प्रमाणे प्रत्येकाने व्हावे. ती आतून पोकळ असल्यामुळे भगवंत तिला हव्या त्या पद्धतीने वाजवू शकतात. त्याच प्रमाणे भगवंताच्या चरणी लीन होण्याआधी मन निर्मळ असू द्या. आपण वरून कितीही स्वच्छ असलो तरी अंतरंगातून स्वच्छ आहोत का याचा विचार करा, असेही त्यांनी सांगितले.
काळभैरवनाथ जयंती (जन्माष्टमी) निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचे व्यवस्थापन लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.