राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेलं असतानाही मुख्यमंत्री पदाचं घोंगडं अद्यापही भिजत आहे. सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा झालेली नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द होत असल्याने चर्चा पुढे सरकत नसल्याचं म्हटलं जातंय. मात्र, यावरून संजय राऊतांना वेगळाच संशय आला आहे. दिल्लीतील महाशक्ती एकनाथ शिंदेंच्या पाठिशी असल्याने एकनाथ शिंदे भाजपाला डोळे वटारून रुसवे फुगवे करू शकत आहेत, असं संजय राऊत म्हणालेत. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची काळजी भाजपाला वाटत नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापन होणार आहे तो फार मोठा विनोद असणार आहे. हे सरकार लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवत आहेत. ज्यांनी मतदान केलंय, त्यांचा आपण केलेल्या मतदानावर किंवा निवडून आलेल्या सरकारवर विश्वास नाही. लोक शंका घेत आहेत. यावर निवडणूक आयोगाने खुलासा केला पाहिजे.आज मारकडवाडीत 144 कलम लावलाय. लोकशाही मार्गाने मतदान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना घरातून बाहेर पडू नका अशा धमक्या दिल्या जात आहेत. अजून राज्यात सरकार यायचंय. त्या मतदारसंघातून भाजपाचा पराभव झालाय. पण मतदारांना वाटतंय विजयी उमेदवाराला जी मते मिळाली आहेत ती कमी मते आहेत.जिंकून सुद्धा फेरमतदान घेत आहेत, कारण कमी मतदान झालंय”, असं संजय राऊत म्हणाले.