पुणे
पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जवळपास १ हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमीपूजन घेण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहुबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.
या शहरात सांस्कृतिकदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथे आयोजन करण्यात आले. आपली मातृभाषा मराठीचा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर प्रधानमंत्री यांनी अभिजात भाषेत समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहराला योग्य दाबाने पुरेसे पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनीही वाहतूक शिस्त राखून सहकार्य करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच अन्य आवश्यक बाबी देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.