रमेश बागवेंना सर्वाधिक मताधिक्य देणार,आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार 

0
13

 

पुणे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इतर उमेदवारांपेक्षा सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा निर्धार आज विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.

रिपब्लिकन युवा मोर्चा व महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवयुग बँक्वेट हॉल या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वांनी निळे फेटे परिधान केले होते. रमेश बागवे यांनादेखील निळा फेटा परिधान करून सन्मान करण्यात आला. सदर मेळाव्यात मार्गदर्शन करताना ज्येष्ठ आंबेडकरी नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयदेव गायकवाड यांनी ” जात्यांध शक्तीला पराभूत करण्यासाठी बागवे यांना सर्व ताकतीने निवडून देण्याचे आवाहन केले.

उमेदवार निवडून आणणे, भाजपाचा पराभव करणे हाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचे ज्येष्ठ नेते अविनाश साळवे यांनी सांगितले. रमेश बागवे विक्रमी मतधिक्याने विजयी होण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक नेता व कार्यकर्ता काम करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आंबेडकरी जनतेचे जीवनमान उंचावणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे दिलेले अधिकारांचे संरक्षण करणे हे माझे जीवनध्येय आहे, असे रमेश बागवे यांनी याप्रसंगी सांगितले.

” रमेश बागवे हे आंबेडकरी चळवळीचा चाळीस वर्षांपासुन अविभाज्य घटक राहिलेले असून दलित पँथरपासून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. चळवळीशी संबंधित प्रत्येक आंदोलन व कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी आहेत. त्यामुळे त्यांचा विजय हा आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने कोणत्याही प्रकारची मतविभागणी न करता बागवे यांच्या विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत, ” अशी माहीती रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (सामाजिक न्याय ) अॅड. जयदेव गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात ,माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते अविनाश साळवे,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रशेखर जावळे ,रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष अशोक जगताप ,मेळाव्याचे संयोजक राहुल डंबाळे, मिलिंद अहिरे, अनिल हतागळे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, रिपाइंचे आनंद कांबळे, दीपक ओव्हाळ, विठ्ठल गायकवाड, अक्षय कांबळे यांच्यासह आंबेडकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी सकाळी रमेश बागवे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंडगार्डन येथे सकाळी नऊ वाजता पदयात्रेला जल्लोषात सुरुवात झाली. बर्निंग घाट, चंचल मित्र मंडळ, रागविलास सोसायटी, संत गाडगे महाराज वसाहत, कवडेवाडी, दरवडेमळा, मदारवस्ती या मार्गे निघालेल्या पदयात्रेचा रेणुकावस्ती येथे समारोप झाला. सायंकाळी ताडीवाला रस्ता, भीमशक्ती चौक, सिद्धार्थ चौक, इनाम मशीद, इंदिरा विकास नगर, कुमार पिनॅकल भाजी मार्केट चौक, सिद्धेश्वर चौक, आनंद मित्र मंडळ, शूरवीर चौक, मारुती मंदिर, बालमित्र मंडळ, वनप्पा चौक, लोकसेवा मंडळ, पंचशील येथे कार्यकर्त्यांच्या उत्साहात पदयात्रा निघाली.

संगीता तिवारी,दीपक रामनानी, कविराज संगेलिया, विजय जगताप, प्रकाश बर्गे, जनार्दन बोया, माणिक यादव, योगेश वाघेला, प्रदीप परदेशी, संजय कवडे, मिलिंद अहिरे, मीरा शिंदे, संतोष माथे, बापू उजगरे, योगेश वाघेला यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आप तसेच विविध संघटना यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षांच्या झेड्यांनी संपूर्ण परिसर महाविकास आघाडीमय झाला होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here