पुणे
मागील काही दिवसापासून राज्यभरात महिला अल्पवयीन मुली यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत.या घटनांच्या निषेधार्थ पुण्यात माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या नेतृत्त्वाखाली मातंग एकता आंदोलनाच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
भवानी पेठेतील क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अरुणकुमार वैद्य स्टेडियम पुढे नाना पेठ,रास्ता पेठ,सोमवार पेठ या मार्गाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश बागवे,सौ.झैनाब रमेश बागवे, महिला अध्यक्षा ॲड.राजश्री अडसूळ, विठ्ठल थोरात , बापू दाखले, सुरेखा खंडागळे, संजय अल्हट, यादवराव सोनावणे,अनिल हतागळे यासह हजारोंच्या संख्येने महिला आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे म्हणाले की,राज्यभरात दररोज लहान मुली,महिला यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे.तर आपल्या पुणे शहरात मागील पंधरा दिवसात शाळेतील लहान मुलीवर आणि बोपदेव घाटात 21 वर्षीय तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत.तर या घटना रोखण्यासाठी राज्यातील सरकार कोणत्याही प्रकारची उपाययोजना करताना दिसत नाही.केवळ फोडाफोडीच राजकारण करण्यावर या सरकारच लक्ष आहे.या गोष्टी करण्यापेक्षा राज्यातील प्रत्येक मुलगी,महिला सुरक्षित राहिली पाहिजे.यासाठी या सरकारने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात,तसेच आजवर घडलेल्या घटनांमधील आरोपींना अटक करून कडक शिक्षा सुनावण्यात यावी,अन्यथा येत्या काळात राज्यभरात आंदोलन केल जाईल असा इशारा यावेळी महायुती सरकारला त्यांनी दिला.