रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार
कोयता गँग, ड्रग्ज, ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण यामुळे कँटोन्मेंटवर डाग लागला आहे. सभ्य पुणे शहर भाजपमुळे बदनाम झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आणि महाविकास आघाडीचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी भाजपवर केली. कँटोन्मेंटची प्रतिमा बदलण्यासाठी बदल झालाच पाहिजे. पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाला लागलेले ग्रहण दूर करण्याची वेळ आली आहे. रमेशदादा मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट व मित्रपक्ष आणि काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक तसेच महाविकास आघाडीचा मेळावा क्वार्टर गेट येथील पीजीआय हॉल येथे संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, उमेदवार रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, विशाल धनवडे, पल्लवी जावळे, प्राची आल्हाट तसेच डॉ. अमोल देवळेकर आणि जावेद शेख यांच्यासह महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आप आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कँन्टोन्मेंटमधील विविध जाती-धर्माच्या समाजात फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे. लोक या खोके सरकारला कंटाळले असून महाविकास आघाडी सरकार येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेने केले आहे. आता रमेशदादांना निवडून द्यायचे आहे, असे आवाहन राऊत यांनी केले. अजित पवार हे वाघासारखे होते. आता त्यांची मांजर झाली असल्याचा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त कँटोन्मेंट मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती. शिवसैनिकांनी तयार केलेल्या केकवर किंगमेकर संजय राऊत असा उल्लेख करण्यात आला होता. गुरू नानक जयंती निमित्त रमेश बागवे यांनी कॅम्पमधील प्रसिद्ध हॉलिवूड गुरुद्वारा येथे शुक्रवारी भेट दिली. गुरुद्वारा येथे दर्शन घेऊन शीख बांधवांना गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी शीख बांधवांनी रमेश बागवे यांचे स्वागत करून विजय निश्चित असल्याचा विश्वास दिला. यावेळी शीख बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.