राज्यात शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे.निर्वावाद बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्री आणि इतर खात्यांबाबत अद्यापही अधिकृत माहिती आलेली नसली तरीही शपथविधीच्या तयारीला वेग आला आहे. दरम्यान,नागपुरातील एका चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रण आलं आहे. गोपाळ बावनकुळे या चहाविक्रेत्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आमंत्रण पाठवलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चहाविक्रेत्याच्या स्टॉलवर देवेंद्र फडणवीसांचा फोटोही लावला आहे.
भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत फडणवीस यांची निवड होणे अपेक्षित आहे. या भैटकीनंतर बाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडेल. त्यानंतर महायुतीकडून सत्तास्थापनेसाठई दावा केला जाईल. राज्यपालांकडून मंत्रिमंडळ शपथविधी समारंभ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता आयोजित केला असल्याची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांना शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, या शपथविधीला नागपुरातील चहाविक्रेत्यालाही आमंत्रण मिळाले आहे.