डॉ. तारा भवाळकर यांच्या निवडीचा साहित्यप्रेमी म्हणून सर्वाधिक आनंद : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
20

साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवासस्थानी भेटून केले अभिनंदन

सांगली :

दिग्गज लेखिका, कवयित्री, अभ्यासक, चिंतक अशा प्रकारची डॉ. तारा भवाळकर यांची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्या कर्तृत्त्वावर, गुणवत्तेवर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान प्राप्त केला आहे. साहित्यप्रेमी म्हणून डॉ. भवाळकर यांच्या निवडीचा आपणास व्यक्तिशः आनंद झाला असल्याचे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथे फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. तारा भवाळकर यांच्या निवासस्थानी भेटून डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
माणसाचं मन आणि स्त्रीचं हृदय जाणवून देणारे असं वेगळंच रसायन म्हणजे डॉ. भवाळकर आहेत. संतसाहित्य, स्त्री संतांचे मनोगत, सीतेचे मनोगत त्यांनी समर्थपणे मांडले आहे, असे सांगून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, विचारांची बीजं रूजून परत आपल्यापर्यंत पोहोचायला हवीत. स्त्रियांच्या समुहाबरोबर साहित्य पुढे नेणे, विचार पुढे नेणे, प्रश्न समजून घेण्याची क्षमता तयार होणे आणि अश्रूंच्या पलीकडे पोहोचून अश्रू बदलण्याचे सामर्थ्य मिळण्याचे काम साहित्यातून होत असतं. तारा भवाळकर यांच्या रूपाने झालेली ही निवड आनंददायी असल्याचे त्या म्हणाल्या.
मराठी पाऊल पडते पुढे…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, या माध्यमातून मराठी पाऊल पडते पुढे, अशी आनंदाची प्रतिक्रिया विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी 2013 पासून प्रयत्न सुरू होते. राज्य शासनाने सातत्याने मांडणी केल्याने आपले स्थान, शक्ती समोर आली. दर वेळीच्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत ठराव असायचा. मात्र, आगामी साहित्य संमेलनात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, आता पुढील नियोजन करायचे आहे. ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले, त्यांचे तसेच राज्य शासन आणि केंद्र शासनाचे त्यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here