बारामतीचा चेहरा बदलण्याचे काम मी केल : शरद पवार

0
5

 

बारामतीचा चेहरा बदलण्याचे काम मी केले. त्यानंतर मी अजित पवार यांच्याकडे अधिकार दिल्यानंतर त्यांनी बारामतीमध्ये विकासकामे केली, हे मान्य आहे. मात्र, बारामतीची देशात कोणामुळे ओळख आहे, याची सर्वांना माहिती आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या विकासाच्या मुद्द्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुनावले. नव्या पिढीकडे सूत्रे देण्याची वेळ आली आहे, असे सांगत त्यांनी बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
विधानसभा निवडणुकीतील बारामतीचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा सोमवारी लेंडीपट्टा येथील मैदानावर झाली. त्यावेळी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यघटना बदलण्याचा मोदी सरकारचा डाव, महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबतही भाष्य करत महायुती सरकारवर पवारांनी टीका केली.
तसेच पुढे ते म्हणाले की,माझी पिढी झाली. त्यानंतर अजित पवार यांची पिढी झाली. अजित पवार यांना बारामतीकरांनी संधी दिली. त्यांना तीन वेळा उपमुख्यमंत्री केले. आता पुढची पिढी युगेंद्रची आहे. त्यांच्याकडे आता बारामतीची जबाबदारी देण्याची वेळ आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते बारामती मतदारसंघातील गावागावांत फिरत आहेत. मतदारसंघातील लोकांबरोबरचा त्याचा संपर्क आणि संवाद वाढला आहे. बारामती मतदारसंघात नेमके काय करायचे आहे, याबाबत ते समजून घेत आहेत. ज्या कष्टाने आम्ही बारामतीचा विकास केला, त्यापेक्षा जास्त परिश्रम घेऊन युगेंद्र बारामतीचा विकास करतील. विकास करण्याची त्यांची जास्त क्षमता आहे, असे सांगत पवार यांनी युगेंद्र पवार यांना निवडून देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here