जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील : मनोज जरांगे पाटील

0
3

 

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला होता.मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही.तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलेच सुनावल्याचे पाहण्यास मिळाले.
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की,आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही मैदानातच नव्हतो. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होते. त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल ते करावे, असे मी जाहीर केले होते. त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते, ते केले. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांनी तिथे तिथे त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले असे ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले की,जरांगे यांच्यावर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा. मराठा समाजाला कोणचेही सोयरसुतक नाही. सरकार कुणाचेही यावे, आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. तुम्हाला आता आरक्षण द्यावे लागेल. कारण मराठ्यांशी कोणीच भिडू शकत नाही. मी आणि मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत मैदानातच नव्हतो. त्यामुळे आम्हाला यामध्ये घेण्याची गरज नाही. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारने बेईमानी करू नये. सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here