दुबईतील चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस करणार

0
15

 

दुबई येथे होणाऱ्या चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस करणार आहेत. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर आणि दीपस्तंभ सांस्कृतिक संघ सांगली या संस्थांच्या वतीने येत्या ७ व ८ नोव्हेंबर २०२४ रोजी या संमेलनाचे दुबई येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे यांनी दिली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विश्व साहित्य संमेलन, आदिवासी, मुस्लिम, बालसाहित्य संमेलन अशा एकूण ५३ संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भूषविले आहे, तर ४१ पेक्षा अधिक संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. यासह डॉ. श्रीपाल सबनीस यांचे ७६ ग्रंथ प्रकाशित झाले असून, महाराष्ट्रातील विविध प्रवाहातील लेखकांच्या ४५२ पुस्तकांना प्रस्तावना दिल्या आहेत. अशा समग्र साहित्यिकाच्या हस्ते चौथ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणे, ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे डॉ. खोब्रागडे यांनी नमूद केले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “विश्व स्तरावर होत असलेला साहित्याचा जागर भारताच्या बंधुभावाची ओळख करून देणारा आहे. कंबोडिया, थायलंड येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविल्यानंतर आता दुबईतील आंबेडकरवादी संमेलनाचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला लाभले, याचा आनंद वाटतो. विवेकाची, चांगुलपणाच्या बेरजेची माझी भूमिका असून, जागतिक स्तरावर ती अधिक प्रभावीपणे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here