हवेली १३ चे सह दुय्यम निबंधक कासेवाड यांची चौकशी करा, सह जिल्हा निबंधक यांच्याकडे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी
हवेली क्र. १३ चे सह दुय्यम निबंधक कासेवाड यांनी तुकडे बंदी, तुकडे जोड कायद्याचा व रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी केला असून त्याची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांच्याकडे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे़
यावेळी सुधीर बोन्द्रे, कृष्णा साठे, ज्ञानेश्वर जाधव आदी उपस्थित होते.
रोहन सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून या कार्यालयामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे हजारो दस्त नोंदणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यामध्ये बनावट एन. ए. आॅर्डर, बनावट भोगवटा प्रमाणपत्र तसेच बोगस बेचाळीस ब च्या एन. ए. आॅर्डरच्या आधारे सुद्धा शेकडो दस्त नोंदविण्यात आले आहे. अनाधिकृत प्लॉट मधील लिहून देणार त्याच गटातील आहे, परंतू लिहून घेणार त्याच गटातील नसताना देखील बोगस हिसेदार दाखवून चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी केली आहे. तसेच आपल्या पदाचा गैर वापर करून काही ठराविक एजंट ला जवळ करून स्वत:च्या आर्थिक लाभाकरीता सक्षम प्राधिकरणाची परवानगी आणि महा रेरा नोंदणी क्रमांक नसल्यास अशा बांधकामातील सदनिकांची नोंदणी करण्यात येऊ नये़ ले आउट मंजूर करून प्लॉट पाडून विक्री करण्यात आल्यास अशा दस्तांची नोंदणी करावी. या संदर्भात परिपत्रक नोंदणी महानिरीक्षकांनी काढले आहे. मात्र या कायद्याचे या परिपत्रकाचे उलंघन करून सर्व प्रकारच्या दस्तांची नोंदणी व ग्रामपंचायत मधल्या बिल्डिंग च्या प्लॉट ची दस्त नोंदणी केली आहे. अशा प्रकारचे हजारो दस्त करून देखील यावर वरिष्ठांकडुन कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. या सर्व प्रकरणाची विशेष पथकानुसार चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. दस्त क्र. १९७२ / २०२३ हा दस्त तुकडा साठेखताचा असुन यामध्ये तुकडा पाडून रेड झोन मधील दस्त करण्यात आला आहे. दस्तामध्ये तुकडेजोड तुकडे बंदी कायद्याचा भंग तसेच रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी करण्यात आली आहे. दस्त क्र. १९९०६ / २०२३ हा दस्त हा तुकडा साठेखताचा असुन ८८ / १ / १ मधुन ४ आरचा तुकडा पाडण्यात आला आहे. तसेच हे क्षेत्र रेड झोन बाधित असुन रेरा कायदा व तुकडे बंदीचा भंग करून दस्त नोंदणी करण्यात आली आहे. दस्त क्र. १९७७१ / २०२३ दस्त हा प्रथम विक्री फ्लॅटचा असुन यामध्ये बोगस नियमितीकरण लावुन तसेच त्याचे पडताळणी देखील बोगस लावुन नोंदणी करण्यात आली आहे. रेरा कायद्याचा भंग करून दस्त नोंदणी करण्यात आली आहे. यासह अनेक नोंदण्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्या आहेत.