सरकार बदलून महाराष्ट्र देशाला दिशा देईल : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट

0
7

 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक देशाला दिशा देणारी आहे. सबंध देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्ट्र नेहमी देशाला दिशा देतो. त्यामुळे या निवडणुकीत सरकार बदलून महाराष्ट्र देशाला योग्य दिशा देईल. महाराष्ट्रातील जनतेला भ्रष्टाचारमुक्त आणि सामान्यांचे प्रश्न सोडविणारे सरकार पाहिजे. धार्मिक मुद्द्यावरून लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या महायुती सरकारला लोक कंटाळले आहेत, अशी टीका राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी एस सिंगदेव,शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा महंमद आणि प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मतदार समंजस आणि हुशार आहेत. नागरिकत्वाच्या कर्तव्याची त्यांना जाण आहे. लोकसभेनंतर काही राज्यांतील निवडणुका एकत्रित घेण्यात येतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, एक देश एक निवडणूक, अशी घोषणा देणाऱ्या भाजपने महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीबरोबर घेतली नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने भाजपला हिसका दिल्याने ते एकत्रित निवडणूक घेण्यास घाबरले असतील, अशी टीका करून पायलट यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ताकद दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. चारसों पारच्या घोषणा देणाऱ्या भाजपला देशातील जनतेने २४० जागांवर आणले, असा टोला त्यांनी लगावला.

सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर बोला, असे आम्ही सांगितले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकार धर्माचा अजेंडा चालवत आहे. ट्रिपल इंजिन सरकार आहे तर या सरकारचे फायदे सांगा, या आमच्या आव्हानाला त्यांच्याकडे उत्तर नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, सिंचन, बेरोजगारी, महागाई, रोजगार, शिक्षण, शेतमालाला हमीभाव या सामान्य लोकांशी संबंधित प्रश्नांवर बोलण्याऐवजी भाजपचे नेते धर्मांधता पसरवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन सरकारच्या कामावर बोलण्याऐवजी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा देतात. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वोट जिहाद आणि मताला धार्मिक युद्ध म्हणतात. हे त्यांच्या पदाला शोभा देणारे नाही. भाजपने नेहमीप्रमाणे पाकिस्तान, हिंदू -मुस्लिम, मंदिर-मशीद हाच प्रचार सुरू केला आहे. भाजपने नोटबंदी केली आणि देशातील महत्त्वाच्या संस्था विकल्या. धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या भाजपला पढोगे तो बढोगे हे सांगण्याची वेळ आली आहे, असे पायलट यांनी सांगितले.

इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग या माजी पंतप्रधानांनी देशासाठी काय केले, असे मोदी विचारतात. मात्र दहा वर्षांत स्वत: काय केले हे मोदी सांगत नाहीत. भाजपच्या मागील सरकारने एका दिवसात १४७ खासदारांना निलंबित केले. राहुल गांधींना बोलण्यास मनाई केली. लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मजबूत असून आता भाजपची मनमानी चालणार नाही. काँग्रेस सत्तेत असो किंवा विरोधात, मुद्द्यांवरून भटकणार नाही. आम्ही सरकारला प्रश्न विचारत राहू, असे पायलट यांनी सांगितले.

पायलट म्हणाले, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांत कल्याणकारी योजना यशस्वी ठरल्या आहेत. महिलांना आणि गरजूंना वेळेत मदत पोहोचली आहे. महायुतीच्या पंधराशे रुपयांत महिलांना मदत होणार नाही. ४५० रुपयांचा घरगुती गॅस सिलेंडर हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. लोकांना फसवून आणि गद्दारी करून आलेले हे महायुती सरकार सत्तेतून घालवण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या बहुमताने सत्तेत येणार आहे. ग्रामीण भागातील जनता महायुतीच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त करत आहेत, असेही ते शेवटी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here