कसबा विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी मनसे नेत्या शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी, ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन शेकडो कार्यकर्त्यांसमवेत मतदारसंघात मिरवणूक काढत भोकरे यांनी शक्तिप्रदर्शन केले. ‘राजसाहेबांचा शिलेदार, कसब्यात विजयी होणार’ असा विजयी संकल्प कार्यकर्त्यांनी केला. गणेश कला क्रीडा मंच येथे अर्ज दाखल करताना शर्मिला ठाकरे यांच्यासह मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, भोकरे यांच्या पत्नी अमृता भोकरे, शहर संघटक निलेश हांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, “यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसे गेमचेंजर राहणार आहे. आमचे सर्व उमेदवार तरुण, तडफदार आणि विकासाच्या वाटेवर चालणारे आहेत. राज्यातील राजकारण वाईट स्थितीतून जात असताना सर्वसामान्यांचे प्रश्न दुर्लक्षित होत आहेत. याकडे मनसेने लक्ष केंद्रित केले असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर, विकासाच्या मुद्द्यांवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या रक्षणावर ही निवडणूक आम्ही लढत आहोत. मनसेने युवा नेतृत्वाला संधी दिलेली आहे. गणेश भोकरे हे तरुण आणि विकासाचा चेहरा असलेले उमेदवार आहेत. कसबा मतदारसंघांमध्ये जनता त्याचत्याच लोकांना कंटाळली असून, जनता नवा आणि तरुण उमेदवार गणेश भोकरे यांना विजयी करेल, असा विश्वास आहे.”
“राज्यभरात मनसेचे सर्वच उमेदवार विजयी होण्यासाठी रणांगणात उतरले आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे यांचा विजय निश्चित आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्याकडे आम्ही कोणतीही विनंती केलेली नाही. आम्हाला लढून जिंकण्यात जास्त आवड आहे. त्यामुळे अमित येथे सर्वांशी चांगली लढत देईल आणि विजयी होईल, असा विश्वास आहे. पुण्यातही आमचे तीनही उमेदवार विजयी होतील. यांच्या अनागोंदीच्या राजकारणात केवळ मनसे जनतेच्या हिताचा विचार करीत आहे,” असेही शर्मिला ठाकरे यांनी नमूद केले.
गणेश भोकरे म्हणाले, “कसब्यातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या तीनही निवडणुकांत मतदारांनी मनसेला चांगला प्रतिसाद दिला होता. आधी भारतीय जनता पक्ष व आता काँग्रेसचे आमदार इथे आहेत. मात्र, कसब्याच्या समस्या अजूनही प्रलंबित आहेत. यांच्या गलिच्छ राजकारणाला जनता वैतागली असून, मनसे कसब्याच्या विकासाचे ध्येय घेऊन रिंगणात उतरलेली आहे.”