बारामती
मागील तीस-पस्तीस वर्षांत बारामतीचा झालेला विकास पाहता, त्यापूर्वी बारामतीची परिस्थिती आठवली की, आपण विकास कामांमध्ये लावलेला हातभार, याचा आनंद मोठा वाटतो. आजची प्रगत बारामती पाहून समाधान वाटते.अशी भावना बारामती विधानसभा मतदार संघाचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित जाहीर सभेत बारामतीकरांना अजित पवार यांनी संबोधित केले.
यावेळी अजित पवार म्हणाले की,माझ्या राजकीय प्रवासात मी कायम महाराष्ट्रातील सर्व समाजघटकाला कायम पुढे नेण्याचं काम करत आलो.परंतु बारामतीचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जगातलं जे चांगलं आहे, ते सगळं बारामतीला मिळावं, याकरता मी नेहमी प्रामाणिक प्रयत्न केले.विकासाच्या बाबतीत बारामतीला केवळ राज्यातच नव्हे तर, संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. बारामतीच्या मातीशी माझं घट्ट नातं हे जन्मापासून जुळलेलं आहे.या मातीची शेवटच्या क्षणापर्यंत सेवा करत राहीन.बारामतीत रुजवलेलं विकासाचं रोपटं जोपर्यंत झाड होत नाही, तोपर्यंत माझ्या मनाला शांती मिळणार नाही.मागील सात निवडणुकांमध्ये बारामतीकरांनी मला भरघोस मतांनी विजयी केलं. त्या बळावरतीच मी बारामतीकरांच्या सेवेस तत्पर राहू शकलो.यंदाची निवडणूक पार पडल्यानंतर बारामतीतील तरुणांना स्थानिक संस्था, पक्षात आणि महत्त्वाच्या पदांवर संधी देण्याचं माझं उद्दिष्ट आहे.बारामतीत असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिक मुलांना नोकऱ्यांत संधी मिळेल, यासाठी मी लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,राज्यातील माझ्या भगिनींना,मायमाऊलींना सबल आणि सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ अतिशय लोकप्रिय ठरली.आतापर्यंत महाराष्ट्रातील सुमारे २.३ कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.या योजनेसह अन्य शासकीय लोकोपयोगी योजना पुढील पाच वर्षे सुरूच ठेवण्यासाठी सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत असू द्या,असे आवाहन त्यांनी केले.