प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ कात्रजमध्ये जाहीर सभा
“मोदी-शहांना खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक औद्योगिक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे. राज्याच्या तिजोरीतील पैशांची हवी, तशी उधळपट्टी सुरु आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी विकासाच्या बाबतीत अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र अधोगतीकडे चालला आहे. ही परिस्थिती थांबवायची असेल, तर महाराष्टाची अधोगती करणाऱ्यांना घरी बसवायचे आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. कात्रज येथील स्वर्गीय अजितदादा बाबर भाजी मंडई मैदानातील सभेवेळी प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथबापू शेवाळे, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, अॅड. अभय छाजेड, भगवानराव वैराट, शिवसेनेचे वसंततात्या मोरे, योगेश ससाणे, कल्पना थोरवे, संभाजी थोरवे, निलेश मगर, प्रवीण तुपे, समीर तुपे, सचिन खरात, विजयराव देशमुख, डॉ. सुनील जगताप यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रातून सर्वाधिक कररुपी पैसा केंद्र सरकारला जातो. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला काय मिळते, याचा विचार केला पाहिजे. वाढत्या महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगारी वाढल्याने युवकांच्या हाताला काम नाही. गुन्हेगारी वाढल्याने महिला सुरक्षित नाहीत. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आरक्षणाच्या मुद्यांवरून जाती-धर्मांत तेढ निर्माण होत आहे. असे असतानाही राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार स्वतःची पोळी भाजून घेण्यात दंग आहे. अशा स्वार्थी, भ्रष्ट सरकारला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याची गरज आहे.”
केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालून पक्ष फोडण्याचे काम केले, याचा खुलासा छगन भुजबळ यांनी केला आहे. आम्हाला कारभार जमणार नाही, अशी टीका काहीजण करतात. पण मीही अनेक वर्षे महाराष्ट्राचा अर्थमंत्री राहिलोय. तेव्हा महाराष्ट्र गुजरातच्या पुढे होता. आज महाराष्ट्राची स्थिती दयनीय होत चालली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यासह त्यांचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली महायुतीतील नेते धर्माधर्मात द्वेष पसरवत आहेत. महिलांचा अपमान करीत आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसला तर फोटो काढून पाठवा, म्हणून कोल्हापूरातला एक नेता धमकावतो. हीच का यांची लाडकी बहीण? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
यावेळी प्रशांत जगताप म्हणाले, “मागच्या आमदारांनी काय दिले, याचा जाब विचारण्याची ही संधी आहे. पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या अकार्यक्षम आमदारांना घरी बसवायची वेळ आली आहे. गद्दारीचा शिक्का पुसून काढायचा आहे. विकासकामात पैसे खाणारा आमदार हवा की, विकासकामे प्रामाणिकपणे मार्गी लावणारा हवा, हे ठरवायची संधी तुम्हाला आहे. ही लढाई स्वाभिमानी विरुद्ध गद्दारी अशी आहे. हडपसर, कात्रजच्या विकासासाठी, उड्डाणपुलांसाठी, चोवीस तास पाणीपुरवठा होण्यासाठी, वाहतूककोंडी व गुन्हेगारीमुक्त परिसरासाठी महाविकास आघाडीला निवडून देण्याची गरज आहे.”