आवश्यक सोयीसुविधा उभारण्याबाबत ऊर्जा विभाग, महापालिका आणि पोलीस आयुक्तांकडे करणार पाठपुरावा
बोपदेव घाट व परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीला शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट देऊन पाहणी केली व आढावा घेतला. तसेच भविष्यात चुकीच्या घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याबाबत पोलीसांना सूचना दिल्या. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी घाटातील रस्त्यांवर प्रचंड अंधार असल्याने प्रकाश खांब लावणे गरजेचे असून याबाबत ऊर्जा विभाग, महापालिके आणि पोलीस विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच येथील चौकीत असणाऱ्या पोलिसांकरिता मोबाईल टॉयलेटची सोय, चौकीतील खिडक्यांना सुरक्षा जाळी आणि घाट क्षेत्रात मोबाईल नेटवर्क सुविधा वाढविणे यांकरिता पोलीस आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली सर्च लाईट व्यवस्था, ध्वनिक्षेपकाद्वारे करण्यात येणारी घोषणा आणि या भागात तैनात करण्यात आलेले दहा पोलिसांचे गस्ती पथकाबाबत डॉ. गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले.