मतांच्या लाचारीसाठी महाविकास आघाडीने २०१२ ते २०२४ या कालावधीत जेवढे दंगे झाले आहेत, त्या दंग्यांमधील मुस्लीम समाजातील आरोपींवरील गुन्हे माफ करण्याची मौलांनाची मागणी मान्य केली आहे. मतांच्या लांगुनचालनासाठी तळवे चाटत आहेत. ध्रुवीकरण केले जात आहे. त्यामुळे एक राहून मतांचे धर्मयुध्द करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ चिखली येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीस बोलत होते. आमदार अमित गोरखे, माजी महापौर मंगला कदम, शिवसेना (शिंदे) उपनेते इरफान सय्यद यावेळी उपस्थित होते.
सरकारने लाडकी बहिण योजनेचा मुस्लीम महिलांनाही लाभ दिला. सर्व योजनांमध्ये सर्व समाजाला सामावून घेतले. असे असताना महाविकास आघाडीकडून व्होट जिहाद सुरू आहे. त्यामुळे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आज जागलो नाही तर पुन्हा झोपून रहावे लागेल. एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन करून फडणवीस म्हणाले, लाडकी बहिण योजना यशस्वी होणार नाही, असे विरोधक म्हणत होते. मात्र, त्यांच्या नाकावर टिच्चून अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे टाकले. या योजनेविरोधात आघाडीचे लाेक न्यायालयात गेले. न्यायालयाने त्यांना चपराक दिली. महायुतीचे पुन्हा सरकार आल्यास महिलांना दरमहा २१०० रूपये देण्यात येतील.