सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांना टोला
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकारणात घडामोडींना वेग आलेला आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज (२९ ऑक्टोबर) शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत देखील बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढत होत असल्यामुळे राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तसेच युगेंद्र पवार यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज काल दाखल केला.
त्यानंतर युगेंद्र पवार यांची आज बारामती मतदारसंघात कान्हेरी या ठिकाणी जाहीर सभा पार पडली. त्यांच्या या सभेला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेत बोलताना भारतीय जनता पार्टीसह अजित पवार यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर खोचक टीका केली. “कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन प्रमाणपत्र घेऊन दाखवा”, असं म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी खोचक टीका केली.
तसेच त्या पुढे म्हणाल्या की,महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरु आहेत. मी अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की हे चिन्ह तुमचं नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे ते (अजित पवार) विसरले असतील. मात्र, मी अजून विसरलेले नाही. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचं काम अदृष्य शक्तीने केलेलं आहे. मी कोणत्याही एका व्यक्तीच्या विरोधात बोलत नाही. मी अदृष्य शक्तीबाबत बोलते. कारण एका अदृष्य शक्तीने आपलं घर फोडलं. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचं काम केलं. लोकसभेच्या निवडणुकीत मी कोणत्या चिन्हावर निवडणूक लढणार हे देखील मला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.