आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून सभा, रॅली, पदयात्रा या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.अशीच परिस्थिती पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघात पाहण्यास मिळत आहे.या आठ विधानसभा मतदार संघात शिवाजीनगर विधानसभा मतदार संघ चर्चेत आहे.या मतदार संघातून माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव दुसर्यांदा भाजपने विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना निवडणूक लढविण्याची संधी दिली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शाह,राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला दुसर्यांदा विधानसभा निवडणुक लढविण्याची संधी दिली.याबद्दल मी सर्व नेतेमंडळींचा आभारी आहे. तसेच मी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आमदार झालो आणि 2017 ते 2022 या दरम्यान मी पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून देखील काम केले.एका बाजूला नगरसेवक आणि दुसर्या बाजूला आमदार या दोन्ही जबाबदार्या पार पडल्या आहेत.या संपूर्ण कालावधीत मतदार संघातील नागरिकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधला.मतदार संघातील प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या कालावधीमध्ये त्यांच्या सोबत राहत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाच्या सर्वागीण विकासासाठी पुणे महापालिका,राज्य सरकारकडून वेळोवेळी पाठ पुरावा करून कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्यात यशस्वी झालो.त्याच दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन तेथील पूल पाडण्यात आला आणि नव्याने आधुनिक पद्धतीने पूल तयार करण्यात येत आहे.त्या पुलाचे लोकार्पण जानेवारीमध्ये केले जाणार आहे.तसेच शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या मेट्रो कामाला गती मिळाली असून जून 2025 पासून नागरिकांच्या सेवेत मेट्रो असणार आहे.जेणेकरून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान राहणार्या नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे.या प्रकल्पासाठी पुणे महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्याने यश मिळाले आहे.यामुळे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,हे सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधिमंडळात आवाज उठविण्याचे काम केले.या सर्व कामाची दखल घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याने आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे.आता निवडणुकी बाबत सांगायचे झाल्यास समोर कोण उमेदवार आहे.याकडे माझे लक्ष नसून मी मागील पाच वर्षातील केलेली विकास काम शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी पाहिले आहेत.त्यामुळे या निवडणुकीत माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.