पालघर जिल्ह्यातील डहाणूत गर्भातील बाळासह महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी 27 नोव्हेंबर 2024 रोजी घडली. पिंकी डोंगरकर राहणार सारणी, तालुका डहाणू असे या मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. या घटनेतील प्राप्त माहितीनुसार प्रथमदर्शनी आरोग्य यंत्रणेतील समन्वयाचा फटका गर्भवती मातेच्या जीवाला बसला असे समजते. सदर मातेचा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले आहे. महिलांच्या आरोग्य विभागामार्फत विविध टप्प्यामध्ये तपासण्या वेळेवर होत नसल्याचे यामधून अधोरेखित होत आहे.
शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पालघर जिल्ह्यात माता मृत्यू दर, कुपोषण याचे प्रमाण जास्त आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने सर्व योजना राबवण्यासाठी फेर आढावा घेऊन गरजूंना त्याचा जास्तीत जास्त लाभ झाला पाहिजे आणि केलेल्या उपाययोजना उपसभापती कार्यालयास अवगत कराव्यात असे निर्देश डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर, उपरोक्त परिस्थितीमध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीकोनातून त्यांनी यापूर्वीच उपाययोजना सूचित केल्या आहेत. प्रतिमाह प्राथमिक आरोग्य क्षेत्रात अंतर्भुत गावामध्ये गर्भवती महिलांची संख्या व त्यांच्या आरोग्याबाबत स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याने आढावा बैठक घ्यावी.
आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचारी/ अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदिवासी / डोंगराळ क्षेत्रात प्राधान्याने भरावीत. आदिवासी / डोंगराळ क्षेत्रात प्रत्येक ४० किलोमीटर अंतरावर एक सुसज्ज स्त्री रूग्णालयाची स्थापना करण्यात यावी. अधिकच्या रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिका आदिवासी क्षेत्रात उपलब्ध करून देण्यात याव्यात.
त्याचबरोबर नंदुरबार, अमरावती, गडचिरोली, धुळे, चंद्रपूर, गोंदिया येथील अतितत्काळ परिस्थितीत रूग्णांना पाडे, गाव, निवासी वस्त्या येथून नजीकच्या रूग्णालयात जलदगतीने पोहोचविता यावे याकरिता त्या परिसरात रस्ता निर्मिती, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. यामुळे प्रत्येक रूग्ण उपजिल्हा तथा जिल्हा रूग्णालयाशी जोडला जाईल अशा सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याआधीच दिल्या आहेत.