राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आणि महामंडळ समित्यामध्ये महायुतीने रिपाइंला स्थान न दिल्याने,आंबेडकरी चळवळीत तीव्र नाराजी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून बैठका,मेळावा घेतले जात आहेत.या महायुतीमधील महत्वाचा घटक म्हणून रिपाइं हा पक्ष आहे.या पक्षाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, महायुतीने रिपाइंसाठी 10 ते 12 जागा सोडाव्यात, त्यातील पुणे कॅन्टोन्मेंटची जागा सोडावी,या जागेवरून इच्छुक असल्याची आक्रमक भूमिका दोन दिवसापूर्वी त्यांनी मांडली होती.परशुराम वाडेकर यांच्या या भूमिकेमुळे ते महायुतीमध्ये राहणार की बाहेर पडणार अशा चर्चा रंगू रंगल्या आहे.
त्या एकूणच चर्चेबाबत रिपाइं राज्य संघटक परशुराम वाडेकर म्हणाले की,राज्यात विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त आमदाराची यादी जाहीर झाली. त्यानंतर विविध समित्या,महामंडळ यांची यादी जाहीर झाली.या दोन्हीमध्ये महायुतीमधील महत्वाचा घटक पक्ष असलेला रिपाइं गटाला कोणत्याही प्रकारचे स्थान देण्यात आले नाही.त्यामुळे राज्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते,नागरिक प्रचंड नाराज आहेत.आम्हाला भेटून नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.आम्ही मागील 40 वर्षापासुन ज्या पक्षासोबत राहिलो.त्या प्रत्येक पक्षाला सर्व परीने साथ दिली असून प्रत्येक ठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार निवडून आणले आहेत.राज्यभरात आमची एक ताकद आहे.ही सर्व पक्षांना माहिती आहे.त्यामुळे आमची एकच अपेक्षा होती की, राज्यपाल नियुक्त आमदारामध्ये किंवा महामंडळाच्या यादीमध्ये रिपाइं च्या एखाद्या नेत्याला, पदाधिकाऱ्यांला काम करण्याची संधी दिली जाईल.पण आमची काही महायुतीमधील नेत्यांनी दखल घेतली नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलवून दाखवली.
तसेच ते पुढे म्हणाले की,15 वर्षापूर्वी आमचे नेते रामदास आठवले साहेब यांनी हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे या नेत्यांना भेटून महायुतीचा प्रस्ताव दिला.त्या सर्व नेत्यांनी तो प्रस्ताव मान्य देखील केला.त्यानंतर झालेल्या 15 वर्षातील स्थानिक पातळीपासून केंद्र स्तरातील निवडणुकांमध्ये रिपाइंने महत्वाची भूमिका बजावून,महायुतीमधील उमेदवार निवडून आणले आहेत.पण वेळोवेळी महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांकडुन रिपाइं च्या नेत्यांना डावलण्याच काम करण्यात आले आहे.पण तरी देखील आम्ही रामदास आठवले साहेबांच्या आदेशानुसार काम करीत आलो आहे.मात्र यंदा आम्हाला विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 जागा राज्यात दिल्या जाव्यात.तर पुणे शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ हा रिपाइं सोडविण्यात यावा,या मतदार संघातून मी निवडणुक लढविण्यास इच्छुक असून आजवर तीन विधानसभा निवडणुका लढविल्या.त्या प्रत्येक निवडणुकांमध्ये क्रमांक तीनची मत मिळवली आहेत.त्यामुळे आमच्या पक्षाचा विचार महायुतीमध्ये केला जावा,हीच माझी अपेक्षा असून दोन दिवसापूर्वी देखील पत्रकार परिषद घेऊन पुणे कॅन्टोन्मेंटमधून निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे.त्या जागेवरून मी निश्चित निवडून येईल,अशी भूमिका मांडली.त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले.पण मी सर्वांना एकच सांगू इच्छितो रिपाइं आणि मी महायुतीसोबत आहोत,मी कुठेही जाणार नाही.केवळ आमचा देखील विचार करावा,रिपाइंला महायुतीमधून जागा मिळाव्यात यासाठी अखेरपर्यंत मागणी असणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले की,भाजप नेतृत्वाने हरियाणामध्ये सर्व पक्षांतील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना संधी देऊन सरकार आणले.त्यानुसार आपल्या राज्यात महायुतीमधील वरीष्ठ नेत्यांनी घटका पक्षांना सोबत घ्यावे आणि आपल्या राज्यात हरियाणा पॅटर्न राबवावा हीच एका कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.