कोथरुड मधील नागरी समस्या सोडवण्यासाठी महापालिकेला पूरक यंत्रणा उभारु : चंद्रकांत पाटील

0
20

कोथरूड मध्ये वाढत्या पुनर्विकासामुळे नागरिकरण वाढत आहे. त्यामुळे नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत असेल, तर महापालिकेसोबत पूरक यंत्रणा उभारु, असे आश्वासन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिले. तसेच, रस्ते, नाले, स्वच्छता, वाहतूक कोंडी आदी समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी दिली.

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे भागातील १२ सोसायटींनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या संकुल संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नागरी समस्यांसंदर्भात बैठक झाली. यावेळी महापालिकेचे वारजे क्षेत्रीय कार्यालयाचे प्रभाग अधिकारी राजेश गुर्रम, क्षेत्रीय अधिकारी दीपक राऊत, कोथरुड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, भाजपा सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरुड दक्षिण अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, प्रभाग १३ च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे यांच्या सह १२ सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला नामदार पाटील यांनी भागातील नागरी समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने नळ स्टॉप ते कॅनल रोड येथील अतिक्रमणे, एरंडवणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भीम ज्योती एसआरए प्रकल्पातील व्यवसायिक दुकांनामुळे होणारी वाहतूक कोंडी; यांसह कचरा, नालेसफाई, आदी समस्या मांडल्या. त्या सोडविण्यामधील प्रशासनाला येणाऱ्या अडचणी ना. पाटील यांनी समजून घेतल्या. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी निधी मिळणार असून; उर्वरित निधी महापालिकेच्या माध्यमातून खर्च करुन मिसिंग लिंक तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोथरूड मधील नागरिकांनीही आपापल्या भागातील मिसिंग लिंक पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

या बैठकीत नळ स्टॉप ते कॅनल येथे अनेक ठिकाणी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असल्याची बाब सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करुन; समस्या सोडविण्यासाठी मार्ग काढू अशी ग्वाही दिली.‌ तसेच भीम ज्योती झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील व्यवसायिक दुकांनांना वाहतूक विभागाने नोटीस देऊन सदर भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवावी, असे निर्देश ना. पाटील यांनी वाहतूक निरिक्षकांना दिले‌. तसेच, पार्किंगसाठी साईड पट्टी मार्किंग करणे, प्रत्येक भागाचे सर्वेक्षण करुन पी-वन-पी टू पार्किंग व्यवस्था उभारावी, तसेच, वाहतूक कोंडी होणारे भागांचे सर्वेक्षण करुन वाहतूक नियमनासाठी चौकाचौकात वाहतूक पोलीस अथवा वॉर्डनची नेमणूक करावी, असेही निर्देश दिले.

कोथरुड मध्ये मोठ्या प्रमाणात पुनर्विकास प्रकल्प सुरु असून; नवीन गृहप्रकल्प हा अनेक पटीने मोठा उभा राहत आहे. त्यामुळे कोथरूड मधील नागरीकरण वाढत आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका तोकडी पडते स्वाभाविक आहे. त्यामुळे सोसायटीच्या अंतर्गत भागातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनीही काम केले पाहिजे. त्यासोबतच महापालिकेला २५ जणांची पूरक यंत्रणा उभारुन सदर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न कर, असे आश्वस्त केले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या समोर मांडलेल्या समस्या सोडविल्याबद्द‌ल संकुल संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांचे आभार मानले. त्यावर कृतज्ञता व्यक्त करुन, नागरी समस्या सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द असल्याची ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here